कोल्हापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी नवीन योजना
KhetiGaadi always provides right tractor information
महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्हा कृषी आणि औद्योगिक क्षेत्रात प्रगत आहे. जिल्ह्यात पश्चिम ते पूर्व आणि उत्तर ते दक्षिण असे विविध प्रकारचे पर्जन्यमान आणि हवामान आहे. पश्चिम घाटात पावसाचे प्रमाण जास्त असते आणि पूर्वेकडे जाताना ते कमी होते. जिल्ह्यातील सर्वाधिक लागवडीखालील क्षेत्र उसाखाली आहे. उसाचे उत्पादन वाढवण्यासाठी शेतकरी रासायनिक खतांचा आणि पाण्याचा अतिवापर करतात. यामुळे काही भागातील जमीन क्षार बनत आहे.
उसाच्या पाचटापासून सेंद्रिय खत
ऊसतोड झाल्यानंतर शिल्लक राहिलेला उसाचा पाला लोक जाळतात, ज्यामुळे हवा प्रदूषित होते. उसाचे पाचट न जाळता ते कुट्टी करून शेतामध्ये कुजवल्यास त्यापासून उत्तम प्रतीचे सेंद्रिय खत पिकाला उपलब्ध होते. शिवाय यामुळे मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता देखील वाढते. उत्पादकता वाढवताना जमीन पाणी, हवा यांचे प्रदूषण होणार नाही, यादृष्टीने शाश्वत शेती करणे ही काळाची गरज आहे. त्याकरिता शेतकऱ्यांनी जमिनीच्या आरोग्याची तपासणी करून जमीन आरोग्य पत्रिकेत दिलेल्या शिफारशीनुसार रासायनिक खतांबरोबर सेंद्रिय खतांचा वापर करणे, शेणखत, गांडुळखत यांचा वापर करणे आवश्यक आहे.
या संदर्भात अधिक सविस्तर माहिती हवी असल्यास, कृपया तुमच्या KhetiGaadi सल्लागारांशी 07875114466 या क्रमांकावर कॉल करा किंवा connect@khetigaadi.com वर ईमेल लिहा.
एक एकरात किती पाचट मिळते?
ऊस तोडून गेल्यानंतर जी वाळलेली पाने शेतात पडतात, त्यास पाचट असे म्हणतात. पाचटामध्ये लिग्रिनचे प्रमाण १५ टक्के असते. पाचटावर टोकदार केसासारखी कुसे असल्यामुळे जनावरे ते पाचट खात नाहीत. पाचट लवकर भरभर जळून राख होते. त्यामुळे पाचटाचा उपयोग जाळण्यासाठी करता येत नाही. सर्वसाधारणपणे एक एकर शेतातून ३ ते ४ टन पाचट उपलब्ध होते व त्यापासून १ ते २ टन सेंद्रिय खत मिळते.
पाचटाचे फायदे काय आहेत?
- शेतामध्ये वेगळे सेंद्रिय खत घालण्याची गरज नाही, कारण पाचटाद्वारे एकरी १ ते २ टन सेंद्रिय खत मिळते.
- पाचट हे जमिनीवर आच्छादन म्हणून काम करते.
- जमिनीवर पाचट पसरल्यामुळे बाष्पीभवन कमी होते त्यामुळे पाण्याची बचत होते.
- पाचटामुळे जमीन झाकल्यामुळे तणाची वाढ होत नाही.
- हिरवळीसाठी किंवा शेणखतासाठी लागणा-या खर्चात बचत होते.
जिल्हा परिषदेची मदत
या सर्व गोष्टींचा विचार करून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत ५० टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना पाचट कुट्टी मशीन (sugarcane thrash cutter) उपलब्ध करून देण्याची योजना आखण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत मशीनच्या किमतीच्या ५० टक्के किंवा १ लाख रुपये यापैकी जे कमी असेल ते अनुदान शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. यावर्षी जिल्ह्यात एकूण अशा ३० अनुदानित पाचट कुट्टी मशीनचे वितरण करण्यात येणार आहे.
बियाणे अनुदान ७५% टक्के; गांडूळखत अनुदान ४०%
एवढेच नव्हे तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सेंद्रिय खतांचा वापर करावा, या उद्देशाने डी. एम. एस. स्वामीनाथन कृषी भू-संजीवनी या योजनेच्या माध्यमातून ताग/धैंचाचे बियाणे देखील ७५ टक्के अनुदानात पुरविण्यात येणार आहे. त्याचबरोबर पर्यायी खतांचा वापर वाढावा, या दृष्टीने मागणीनुसार जिल्हा परिषद कृषी विभागाच्या गांडूळखत निर्मिती प्रकल्पातून गांडूळखत उत्पादित करून ४० टक्के अनुदानावर उत्तम दर्जाचे गांडूळखत उपलब्ध करून दिले जाणार आहे.
मोफत प्रशिक्षण मिळणार
त्याचबरोबर शेतकरी आणि महिला बचतगट यांना आवश्यक असल्यास मोफत प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे. तसेच ५० टक्के अनुदानावर स्लरी फिल्टर युनिट, बॅटरी ऑपरेटेड स्प्रेपंप इत्यादी योजनांचा लाभ दिला जाणार आहे. शेतकऱ्यांनी या सर्व योजनांचा लाभ घ्यावा आणि श्ञाश्वत सोतीतून आपला विकास साधावा, असे आवाहन कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकाऱ्यांद्वारे करण्यात आले आहे.
देशातील कष्टकरी शेतकऱ्यांना उपयुक्त ठरतील अशा विविध पीक पद्धती, उत्पन्न वाढ योजनांची माहिती मिळवण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना आधार देण्याच्या उद्देशाने राबवण्यात येणाऱ्या विविध कर्ज योजना आणि इतर सरकारी योजनांच्या अद्ययावत माहितीसाठी आमच्या whatsapp चॅनेलच्या माध्यमतून आमच्याशी सतत संपर्कात रहा. कृषीविषयक अधिक तपशीलवार माहितीसाठी, नियमितपणे KhetiGaadi ला भेट द्या!
To know more about tractor price contact to our executive